पुणे : पुण्यातील पौड रस्त्यावर कचरा डेपो परिसरात भरधाव दुचाकी घसरून एका महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भरधाव दुचाकी घसरून पाठीमागून आलेल्या पीएमपी बसच्या चाकाखाली तरुणी आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर या अपघातात दुचाकीस्वार तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी पीएमपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस शिपाई अमोल नजन यांनी याबाबत कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
माही मयूर गांधी (१९, रा. शोभा ऑप्टिमा बिल्डींग, माणिकबाग, सिंहगड रस्ता) असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. दुचाकीस्वार मंदार नानवटी असं जखमी झालेल्या दुचाकीस्वाराच नाव आहे. मंदारवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार मंदार आणि त्याची मैत्रीण माही हे दोघे पौड रस्त्याने एमआयटी महाविद्यालयाकडे शनिवारी १६ मार्चला सकाळी सातच्या सुमारास निघाले होते. यावेळी कचरा डेपोसमोर भरधाव दुचाकी घसरल्याने दोघेही रस्त्यावर पडले. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव पीएमपी बसच्या चाकाखाली माही सापडली.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या माहीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पळून गेलेल्या पीएमपी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बसवराज माळी करत आहेत.