पुणे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. या दरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी पुरेशी खबरदारी घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काही ठराविक भागांमध्ये ठराविक काळासाठी मद्यविक्रीवर निर्बंध लादले आहेत. बारामती, मावळ, पुणे आणि शिरूर मतदारसंघांसाठी हे आदेश आहेत. मद्य विक्री बंद ठेवण्याचे दिवस देखील नक्की केले आहेत. ज्या भागात आदेशाचे उल्लंघन होईल, तेथील स्थानिक यंत्रणा त्यास जबाबदारी असेल असे आदेशात नमूद केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने बारामती, मावळ, पुणे आणि शिरूर मतदारसंघांसाठी हे आदेश काढले आहेत. त्याच्या प्रती राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला पाठविल्या आहेत. ५ मे, ६ मे, ११ मे, १२ मे, १३ मे, ४ जून रोजी प्रत्यक्ष मतदानाचा दिवस आणि मतमोजणी दिवशी मद्यविक्री बंद राहणार आहे. निवडणूक शांततेच्या, निर्भय व नि:पक्षपाती वातावरणात व्हावी, कुठेही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी निवडणूक कालावधीत मद्यविक्री करण्यास मनाई आहे. यासाठी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हा आदेश काढला आहे.
प्रत्येक टप्यातील मतदानाच्या दिवशी मतदान संपण्यासाठी निर्धारित केलेल्या वेळेच्या ४८ तास आधीपासूनच ही मद्यविक्री बंद असणार आहे. तसेच, मतमोजणीच्या दिवशी अस्तित्वात असलेल्या नियमांच्या तरतुदीनुसार कोरडा दिवस घोषित केला आहे. तिसऱ्या टप्यात पुणे जिल्ह्यातील बारामती आणि चौथ्या टप्यात मावळ, पुणे व शिरूर मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यामुळे सर्व देशी, विदेशी, बिअर, वाईन, ताडी आदी प्रकारच्या मद्यविक्रीस मनाई केली आहे. बारामती, पुणे, मावळ, शिरूर मतदारसंघातील सर्व देशी, विदेशी, बिअर, वाईन निर्माणी (कारखाने) या कालावधीत उत्पादन सुरू ठेवू शकणार आहेत.
दरम्यान, आदेशाचे उल्लंघन झाल्यास परवानाधारकांविरुद्ध कडक कारवाई केली जाणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कार्यक्षेत्र निरीक्षकांची असणार असल्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आदेशात म्हटले आहे.