पुणे : राज्यात थंडीचे प्रमाण वाढत असून, अनेक शहरांचे तापमान १४ अंशांच्या खाली आहे. मंगळवारी राज्यात सर्वात कमी तापमान जळगाव येथे ८ अंश, नाशिक ९.४, तर पुणे शहराचे किमान तापमान १२.४ अंश इतके होते. थंडीची ही लाट १८ डिसेंबरपर्यंत राहणार आहे. राज्यातील हवामान कोरडे झाले असून, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे किमान तापमान वेगाने घटले आहे. अनेक भागांत चांगलाच गारठा जाणवत आहे.
मध्य महाराष्ट्रात अनेक भागांत थंडीचा कडाका आहे. मराठवाडा व विदर्भातील अनेक शहरांच्या तापमानात घट झाली असून, ११ ते १४ अंश सेल्सिअसदरम्यान तापमान आहे. दरम्यान, कोकणात उन्हाचा चटका बसत आहे. रात्रीच्या तापमानात काहीशी घट झाली आहे.
उत्तर भारतात पाकिस्तानातून पश्चिमी चक्रवात सक्रिय झाला असून, अवघा देश गारठण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर भारतातून महाराष्ट्रात शीत लहरी वेगाने दाखल झाल्याने दोन दिवस आधीच राज्य गारठण्यास सुरुवात झाली आहे. प्रामुख्याने जळगावचा पारा मंगळवारी राज्यात सर्वात कमी ८ अंशांच्या खाली आला आहे. त्यापाठोपाठ नाशिक, अहिल्यानगर, पुणे शहरासह विदर्भातील नागपूर आणि परिसर गारठला आहे. थंडीची ही लाट १८ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
राज्याचे २४ तासांतील किमान तापमान
जळगाव ८, नाशिक ९.४, अहिल्यानगर ११.७, महाबळेश्वर १३.२, मुंबई (कुलाबा) २०.८, रत्नागिरी २१.१, कोल्हापूर १९.१, सातारा १५.८, सोलापूर १९.१, धाराशिव १६.३.