पुणे : शहरात उन्हाचा चटका बसत असला, तरी रात्रीचा थंडावा कायम आहे. मंगळवारी (दि. २९) शहरात कमाल तापमान ३३.७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १८.९ अंश सेल्सिअसवर होते. दरम्यान, पुढील चार दिवस आकाश निरभ्र राहणार असून तापमानात किंचित बदल होणार आहे. शहरातील अंशतः ढगाळ असलेले हवामान गायब झाले असून, आकाश मोकळे झाले आहे.
त्यामुळे स्वच्छ सूर्यप्रकाश पडत असल्यामुळे तापमानात वाढ कायम आहे. तसेच, सूर्याचे दक्षिणायन सुरू असल्यामुळे रात्रीचे थंड वारे वाहत आहेत. या सर्व कारणांमुळे दुपारी उन्हाचा चटका व रात्रीचा थंडावा असे वातावरण पुणेकर अनुभवत आहेत. येत्या ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान आकाश निरभ्र राहणार आहे. या दरम्यान कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८ ते २९ अंश सेल्सिअसदरम्यान राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.