पुणे : उत्तर भारतात पश्चिमी विक्षोप (थंड वाऱ्याचा झंझावात) सक्रिय असल्यामुळे उत्तरेकडून थंड वारे राज्यात येत आहेत. त्यामुळे राज्यभरात कमाल – किमान तापमानात सरासरी एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका पुन्हा वाढला आहे. या महिन्यात दुसऱ्यांदा किमान तापमानाचा पारा १०.९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला. शहर आणि परिसरात सोमवारी (ता. २६) आकाश ढगाळ राहणार असल्याने थंडीचा कडाका कमी होऊन किमान तापमानाचा पारा पुन्हा उसळी घेईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे रविवारी वर्तविण्यात आला.
शिवाजीनगर येथील वेधशाळेत या महिन्याच्या पहिल्याच दिवशी किमान तापमान १०.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. त्यानंतर किमान तापमानाचा पारा सातत्याने वाढत गेला. पुणे शहरात १६ फेब्रुवारीला १६.५ अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान वाढले होते. उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा हिमवर्षाव सुरू झाला आहे. तेथून थंड आणि कोरडे वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या वातावरणावर होत आहे.
राज्यातील पुण्यासह बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा खाली घसरला असल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदण्यात आले आहे. परिणामी पहाटे गारठा आणि दुपारी चटका अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी पाच अंश तर सोलापूर येथे उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
सोमवारी (ता. २६) सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. सोमवार आणि मंगळवारी मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली परिसरात हलक्या पावसाचा अंदाज आहे. मंगळवारी (ता. २७) धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. रविवार आणि सोमवारी विदर्भात सर्वत्र पावसाचा अंदाज आहे. मंगळवारी (ता. २७) भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर परिसरात हलक्या पावसाचा अंदाज आहे. सोलापूर आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा फारसा जोर नसेल; मात्र विदर्भात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे हवामान विभागाने विदर्भात सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून हवामानात वेगाने बदल होत आहेत. निफाड, धुळ्यासह मध्य महाराष्ट्रात दोन दिवसांपासून किमान तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे.
शिवाजीनगर वेधशाळेत शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमानाचा पारा १२.८ अंश सेल्सिअस नोंदला होता. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत हे तापमान १०.९ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले. अवघ्या चोवीस तासांमध्ये १.९ अंश सेल्सिअसने किमान तापमान कमी झाल्याने हवेतील गारठा वाढला.