पुणे : पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसीत २० फेब्रुवारीला पुणे शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ११०० कोटी रुपयांचे एमडी जप्त केले होते. कुरकुंभ एमआयडीसी येथील कारखान्यात तयार करण्यात आलेल्या ड्रग्जला एक कोडवर्ड देण्यात आला होता. “न्यू पुणे जॅाब” असा एमडी ड्रग्स बनवायच्या फॅार्म्युलाचा कोड वर्ड होता. कुरकुंभ येथे अर्थकेम कारखान्यात एमडी ड्रग्ज तयार करण्यात येत होते. मात्र पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कुरकुंभ येथे कारवाई करत ६५० किलो एमडी जप्त केले. ज्याची किंमत तब्बल ११०० कोटी इतकी आहे.
दरम्यान, “न्यू पुणे जॅाब” ची जबाबदारी आरोपी युवराज भुजबळवर होती. भुजबळ हा केमिस्ट्री विषयातील पीएचडी धारक आहे. त्याला डोंबिवलीमधून अटक करण्यात आली आहे. आरोपी भुजबळला ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील कुरकुंभमध्ये ॲाक्टोबर २०२३ पासून एम डी ड्रग्जची निर्मिती सुरू होती. अँटी मलेरिया ड्रग कंपोनंट आणि ॲंटीरस्ट हे २ रसायन कुरकुंभमधील कारखान्यात तयार होत होते. पुणे शहर पोलिस दलाने गेल्या २ दिवसात विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि दिल्ली येथे कारवाई करुन तब्बल २ हजार २०० कोटी रुपयांचे ११०० किलोपेक्षा अधिक एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत.