पुणे : सातत्याने पुढे ढकलण्यात येणाऱ्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सहकार निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. राज्य शासनाने ३० सप्टेंबरपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या होत्या. आता निवडणूक घेण्याचा निर्णय आणि प्रक्रिया सुरू झाल्यामुळे राज्यातील २९ हजार ४४३ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील ३०४८ संस्थांचा समावेश आहे.
सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या निर्णयानुसार, राज्य स्तरावर ‘अ’ वर्गातील ४२, ‘ब’ वर्गातील १७१६, ‘क’ वर्गातील १२ हजार २५० आणि ‘ड’ वर्गातील १५ हजार ४३५ अशा मिळून एकूण २९ हजार ४४३ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. पुणे जिल्ह्यातील पुणे शहर ८२८, ग्रामीण भागातील २२२० अशा ३०४८ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे यांनी या निवडणुकांचे आदेश प्रसूत केले आहेत. त्यानुसार उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ज्या सहकारी संस्थेच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे, अशा सहकारी संस्था वगळून शासनाच्या आदेशानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया ज्या टप्प्यावर पुढे ढकलण्यात आली होती, त्या टप्प्यापासून १ ऑक्टोबपासून निवडणूक प्रक्रिया सुरू करावी. अ, ब वर्गातील ज्या सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम २०१४ मधील तरतुदीनुसार तयार करून प्राधिकरणाच्या मान्यतेसाठी सादर करावा, असे आदेशात नमूद केले आहे.
निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्याची दाट शक्यता
राज्यात लवकरच निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी होणार किंवा कसे, याबाबत अद्याप संभ्रम आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा लक्षात घेता सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत स्थगित केल्या होत्या. या निवडणुकांबाबत राज्य शासनाकडून अद्याप नव्याने आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या निवडणुकांबाबत राज्य शासनाकडून काही आदेश प्राप्त झाल्यास त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल. – अनिल कवडे, आयुक्त, सहकार निवडणूक प्राधिकरण