पुणे : राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस जोरदार कोसळत आहे. पर्यटननगरी लोणावळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून सखल भागात पाणी साचलेलं आहे. तर रस्त्यांवर पाणीचं पाणी झाल आहे. त्यामुळं स्थानिक नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. चोवीस तासांत या मोसमातील उच्चांकी पाऊस पडला असून तब्बल 275 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.
लोणावळा आणि परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे मळवली भागातील बंगल्यात 20 ते 22 पर्यटक अडकले होते. या पैकी 15 पर्यटकांना बाहेर काढण्यात शिवदुर्ग रेस्क्यू टीमला यश आलं आहे. उर्वरित पर्यटकांना ही काही वेळातच बाहेर काढण्यात येईल. हे सगळे पर्यटक बंगल्यात बसले होते, मात्र बाहेर ढगफुटी सदृश्य पाऊस पडत असल्याची कल्पना यांना नव्हती. बाहेर येऊन बगितल असता चहुबाजूंनी पाणी झाल्याचं दिसून आलं. आता या सर्व पर्यटकांना बाहेर काढण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.
पुणे शहरातील मध्य भागात पावसाचा जोर दिसून आला, तर शिवाजीनगर परिसरात 24 तासांत सरासरी 15.5, तर चिंचवडमध्ये 39 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरातील चारही धरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. मान्सून सुरू झाल्यापासून पुणे शहर परिसरात पहिल्यांदाच 24 तास पावसाची संततधार सुरू होती. पावसाचा जोर कमी असल्याने सोमवारी 11.5, तर मंगळवारी 4.5, असा 24 तासांत एकूण 15 मिमी पाऊस शिवाजीनगर भागात बरसला आहे.