संतोष पारधी
वाकी बुद्रुक, (पुणे) : स्वराज्य संघाच्या माध्यमातून सिद्धबेट परिसर स्वच्छ करण्यात आला असून यावेळी सदर ठिकाणी १८ बॅगा प्लास्टिकचा कचरा गोळा करण्यात आल्याची माहिती स्वराज्य संघाचे खेड तालुका अध्यक्ष रोहिदास महाराज मांजरे व स्वराज्य संघाचे सचिव शामकांत निघोट यांनी दिली
स्वराज्य संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब दिघे यांनी प्रत्यक्ष सिद्ध बेटाची जाऊन पाहणी केली त्यानंतर स्वराज्य संघाचे अध्यक्ष बाजीराव महाराज बांगर यांच्याकडे ही चर्चा केली आणि त्यानंतर स्वराज्य संघाच्या माध्यमातून सिद्धबेट स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली.
यावेळी बाबासाहेब दिघे व स्वराज्य संघाच्या काही महिला व इतर कार्यकर्त्यांनी सर्व परिसर हातामध्ये झाडू घेऊन त्या ठिकाणी साफ सफाई केली. या ठिकाणी गुटख्याच्या पुड्या, प्लास्टिक रॅपर, एक बॅग भरून दारूच्या बॉटल आणि अन्य १८ बॅगा प्लास्टिकचा कचरा गोळा करण्यात आला.
याबाबत बोलताना स्वराज्य संघाचे अध्यक्ष बाजीराव महाराज बांगर म्हणाले, “स्वराज्य संघाच्या वतीने या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करतो की येणारे भाविक असतील वारकरी असतील किंवा महाराज मंडळी असतील त्या परिसराचा पावित्र्य जपून आपल्या सगळ्यांची त्या ठिकाणी जबाबदारी आहे ही जबाबदारी लक्षात घेऊन आपण हा परिसर स्वच्छ आणि पवित्र कसा राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे.”
यावेळी या मोहिमेमध्ये उपाध्यक्ष बाबासाहेब दिघेयांच्या नेतृत्वाखाली स्वराज संघाचे अनेक पदाधिकारी या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.
यामध्ये सदस्य सचिन कारले, संतोष टाकळकर, खेड तालुका उपाध्यक्ष संतोष ज्ञानेश्वर टाकळकर, अमोल बोंबले, खेड तालुका महिला अध्यक्ष प्रतिभा पवार, उर्मिला गवारे, राधा बोघाडे, जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब ढेरंगे, शिरूर तालुका अध्यक्ष विशाल दिघे, शिरूर तालुका संपर्कप्रमुख विश्वास घाडगे, स्वराज्य संघाचे शेतकरी आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष वनाजी बांगर, नवनाथ बांगर व इतर अनेक कार्यकर्ते या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते.
दरम्यान, संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट लावून सदर ठिकाणी माऊलींचे पसायदान घेऊन मोहिमेची सांगता करण्यात आली.