लोणी काळभोर, ता. 31 : दहावीच्या वर्गात एकत्र शिक्षण घेतलेले विद्यार्थी तब्बल 30 वर्षानंतर समोर आल्यावर एकमेकांना ओळखू शकत नव्हते. परंतु, ओळखल्यानंतर डोळ्यातील निरागस मैत्री जशीच्या तशी समोर आली. आनंद, आश्चर्य आणि कौतुक अशा संमिश्र भावना माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. निमित्त होते ते आपला मित्र सरपंचपदी विराजमान झाल्याचे.
लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भरत काळभोर हे नुकतेच बिनविरोध निवडून आले आहेत. आपला लहानपणीचा मित्र हा सरपंचपदी विराजमान झाल्याचे समजताच सवंगड्याला एकत्र भेटून शुभेच्छा देण्याची सर्वांना आस निर्माण झाली होती. अखेर तो दिवस ठरला अन् सवंगड्यांनी आपल्या सरपंच मित्राची भेट घेतली. मित्राला भेट स्वरुपात श्रीकृष्णाची मूर्ती व पगडी घालून भव्य सत्कार केला. यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
यावेळी शिंदेवाडीचे माजी सरपंच प्रभाकर जगताप, कोरेगाव भीमाच्या सदस्या वंदना काळभोर गव्हाणे, कोलवडी विविध विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष अमोल गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष पै. मनोज काळभोर, शिक्षक वैभव वेदपाठक, उद्योजक सुजित सोनी, महेश दुगाणे, सुरेश काळभोर, युवराज रुपनर, वैशाली हरपळे, वैशाली ढवळे, भारती मेमाणे, ज्योती फलटणकर यांच्यासह 60 माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये सन 1995 ते 96 साली दहावीच्या वर्गात शिकत असलेले सुमारे 60 माजी विद्यार्थी तब्बल 30 वर्षानंतर शुक्रवारी (ता.28) सरपंच मित्राचा सत्कार करण्यासाठी एकत्र आले होते. सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांनी आपला परिचय करून दिला. शालेय जीवनातील काही गंमतीदार आणि काही विनोदी आठवणींना उजाळा दिला. शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा मारून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो, हे विसरून गेले होते.
शाळेतील माजी विद्यार्थी आज राजकारण, शिक्षण, पोलीस प्रशासन, औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करीत असून ते आपल्या क्षेत्रात कामाचा वेगळा ठसा उमटवत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना जीवनात यश मिळवले असले, तरी त्यामागे शाळेचे संस्कार आहेत. अशी भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. त्यानंतर स्नेह भोजन व फोटोसेशन झाले. अनेकजण हे आनंदी क्षण आपल्या कॅमेर्यात टिपत होते. या आनंदयात्री सोहळ्यात सर्वच जण हरवुन गेले होते. कार्यक्रम संपून एकमेकाला निरोप देताना सगळ्यांचेच डोळे पाणावले होते. सर्वांनी एकमेकांना मदत करायची व पुन्हा लवकर भेटण्याचे ठरवून सगळे आपापल्या घरी आनंदाने निघून गेले.