पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षांचे हॉलतिकीट विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने उद्या बुधवार म्हणजे ३१ जानेवारीपासून मिळणार आहे. विद्यार्थी राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून हॉलतिकीट डाऊनलोड करू शकता. हॉलतिकिटासाठी शाळांनी विद्याथ्यांकडून कोणतेही शुल्क आकारू नये, असं राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
तसेच हॉलतिकिटावर मुख्याध्यापक यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी, हॉलतिकिटामध्ये विषय किंवा माध्यम बदल असेल तर त्याच्या दुरुस्त्या शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्यात. हॉलतिकिटावर फोटो असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा सदोष फोटो चिटकवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे.
एखाद्या विद्याथ्यांकडून हॉलतिकीट गहाळ झाल्यास संबंधित शाळांनी पुन्हा हॉलतिकीट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा मारून विद्याथ्यांकडे हॉलतिकीट द्यावे, असही राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केलं आहे.
या संकेतस्थळाचा वापर करून करा डाऊनलोड
या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व माध्यमिक शाळांना मार्च २०२४च्या परीक्षेचं हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर बुधवारपासून ‘स्कूल लॉगिन’मध्ये डाऊनलोड करून घेण्याची सोय उपलब्ध होणार आहे.