पुणे : पुण्यातील कॉँग्रेस भवनमध्ये दोन गटात मारहाण झाल्याची घटना सामोर आली आहे. कॉँग्रेसचे कार्यकर्ते मुकेश मधुकर धिवार यांना एका माजी नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली आहे. ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. मुकेश धिवार हे दिवंगत नेते पतंगराव कदम आणि कॉँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांचे निकटवर्ती आहेत.
दरम्यान, कॉँग्रेस भवनमध्ये बंदोबस्ताला असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ धिवार यांना मारहाण करणाऱ्यांपैकी एकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मुकेश धिवार यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून योग्य ती कारवाई करण्याचे काम सुरू असल्याचे शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरुन कॉँग्रेस पक्षात धुसफूस सुरु झाली होती. ती धुसफूस अद्यापही सुरूच असल्याचे या घटनेने समोर आले आहे. कॉँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीला माजी नगरसेवक आबा बागूल यांनी विरोध केला होता. त्यावेळी धिवार यांनी बागूल यांना पक्षातून काढून टाका अशी मागणी केली होती. दरम्यान, या वादाची किनार या मारहाणीला आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.