लोणी काळभोर, (पुणे) : पीएमआरडीए चे अधिकारी जागा मोजून देत असताना झालेल्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पठारे वस्ती परिसरात गुरुवारी (ता.1) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शहनाज ताजुद्दीन तांबोळी (वय ३९, पठारेवस्ती, कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अकबर बुडन शेख, अंजुम अलिम शेख, आशिया अकबर शेख, मेहमुदा रहिम शेख, रोशन बुडन शेख व बुडत शेख (सर्व रा. पठारे वस्ती , कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर आयशा अलीम शेख (वय २७, प्लॉट नं. ५०४ श्रीकृष्ण सोसायटी घोरपडे वस्ती, कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादनुसार, शहनाज ताज्जुदिन तांबोळी, बेगम ताज्जुदिन तांबोळी, रजिया फुटानकर, साहिल फुटानकर, आषिश उर्फ सोनू गुर्खा ( सर्व रा. पठारेवस्ती, कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे) व नसरीन फिरोज शेख (रा. घोरपडेवस्ती, कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा जणांची नावे आहेत. अशी एकूण मिळून १२ जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शहनाज तांबोळी या आय. टी, कंपनीमध्ये नोकरीस आहेत. त्यांच्या राहत्या घराचे बांधकाम चालू आहे. त्यांच्या घरा शेजारी राहणारे अलिम शेख यांच्या घराची मोजणी करण्याकरिता पीएमआरडी पुणे येथील ऑफिसमधून काही अधिकारी व कर्मचारी आले होते.
अलिम शेख यांचे घराची मोजणी चालु असताना, आरोपींनी फिर्यादी शहनाज तांबोळी यांच्या घरासमोर येवून यांचे सुध्दा घर कायदेशीर पद्धतीने बांधलेले नाही, यांचे घर आधी तोडुन टाका असे म्हणत होते. त्यावेळी फिर्यादी यांची आई बेगम घरातून बाहेर आल्यानंतर आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादी यांनी मध्यस्ती करून भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला. तसेच तुम्हाला जे काही करायचे आहे ते कायदेशीर करा. असे सांगितले.
यावेळी फिर्यादी शहनाज यांची बहीण नसरीन शेख घरी येत असताना, आरोपी अकबर शेख याने पकडून ठेवले. त्यानंतर आरोपींनी नसरीन सह फिर्यादी व त्यांच्या आईला लाथाबुक्क्यांनी व हाताने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद शहनाज तांबोळी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे.
आयाशा शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी आयशा यांच्या घराचे बांधकाम चालू आहे. पीएमआरडीए चे अधिकारी व कर्मचारी जागेची तपासणी करून निघुन गेले होते. त्यानंतर आरोपी म्हणाले, तुम्ही आमच्या जागेच्या शेजारी कसे घर बांधता ते आम्ही पाहतोच, आम्ही म्हणेल तीच पुर्व दिशा असणार आहे. येथील सर्व लोक आमचे बाजुने आहे असे म्हणून आरोपींनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीव मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे करीत आहेत.