लोणी काळभोर: फुरसुंगी आणि उरूळी देवाची ही दोन गावे मिळून एक नवीन नगरपालिका झाल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यानंतर ग्रामस्थांनी आनंदही व्यक्त केला होता. परंतु, आता या आनंदावर विर्जन पडले आहे. प्रशासनाकडून सुविधा मिळत नसल्याने गेले दोन वर्षे गाव धड नगरपालिकेतही नाही किंवा पुणे मनपातही नाही, अशा दुहेरी परिस्थतीत अडकलेले आहे. नागरीकांचे कोणतेही ही काम गेल्या दोन वर्षात होताना दिसत नाही.
फुरसुंगी आणि उरूळी देवाची या दोन्ही गावांचे नागरिक एमजीपीचे सुरळीत पाणी मिळण्यापासून वंचित आहेत. पुणे महानगरपालिकेचे टॅंकर वेळेत व नियमीत संख्येने मिळतही नाहीत, कचऱ्याचे प्रश्न तसेच आहेत. रस्त्यांवर अनेक ठिकाणी पडलेले खड्डेही बुजविले जात नाहीत. गावात विविध ठिकाणी रात्रीचा काळाकुट्ट अंधार पडलेला असतो. त्याठिकाणी दिवे लावलेले नाहीत. हीच परिस्थिती शिक्षण, आरोग्यसह इतर नागरी सुविधांबाबत आहे. मात्र, टॅक्स गोळा करण्याचे काम जोरदार सुरू आहे. गावातील या विविध विकासकामे आणि नागरी सुविधांसाठी कित्येक वेळा गाव पुणे मनपात असताना पत्रव्यवहार झाले, परंतु महापालिकेने कोणतेही ठोस काम केलेले दिसले नाही.
टॅक्स मात्र भरमसाठ लावून सक्तीने वसूलीचे काम जोरदार सुरू ठेवले आहे. यावर आता नागरीकांचा संताप व्यक्त होताना दिसत आहे. पुढील १५ दिवसांत राज्य शासनाने जर फुरसुंगी आणि उरूळीदेवाची घोषित केलेल्या नवीन नगरपालिकेचा अंतिम निर्णय केला नाही, तर गावातील नागरीक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. आम्हाला पुणे मनपा नको आहे, आम्हाला हवी आहे नवीन नगरपालिका. जर पुणे मनपा प्रशासन शासकीय कामकाजात अडथळा आणला तर नागरीकांवर गुन्हे दाखल करते. मग गेली अनेक वर्षे फुरसुंगीत मागणी करूनही प्रशासन जाणूनबुजून विविध विकासकामे करत नाही. कामे प्रलंबित ठेवत असेल तर या प्रशासनावर गुन्हा का दाखल केला जाऊ नये? असे नागरीक आता बोलायला लागले आहेत.
फुरसुंगी आणि उरूळीदेवाची ही दोन गावे पुणे मनपाचे आयुक्त यांनी ठराव करून वगळलेली आहेत. त्यानुसार पुणे मनपाची नवीन हद्द वर्तमान पत्रात प्रसिध्द केलेली आहे. अशी स्थिती असताना जो पर्यंत या दोन गावांची मिळून झालेल्या नवीन नगरपालिकेचा अंतिम जीआर काढला जात नाही, तोवर या गावांचा विकास तसाच सुरू ठेवावा असा आदेश मुख्यमंत्री यांनी आयुक्तांना दिला असतानाही विकासाचे कोणतेही काम झालेले दिसत नाही. एका बाजूने ही दोन्ही गावे पुणे मनपात अजूनही आहेत, असं बोलायच आणि विकासकामे करायला आमच्याकडे बजेट नाही या उत्तरांनी नागरीक आता हैराण झाले आहेत. त्यामुळे या गावांतील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
सध्या उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावात कुठलेही काम पुणे महानगरपालिकेकडून करण्यात येत नाही. मंजूर झालेली विकासकामे देखील थांबवण्यात आलेली आहेत. आगामी बजेटमध्ये देखील कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. साधी स्ट्रीट लाईट बंद पडली तर ती ठीक होण्यासाठी पंधरा दिवस लागतात. या गावांतील किरकोळ कामासाठी महापालिकेकडे निधी नाही. नागरिकांना मोठ्या प्रमाणावर नागरी समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
– धनंजय कामठे, पुणे जिल्हा कार्यालयीन प्रमुख, भाजपगेले दोन वर्षांपासून या गावांची अवस्था धड नव्या नगरपालिकेतही नाही किंवा पुणे मनपातही नाही अशी झाली आहे. नागरीकांचे कोणतेही ही काम गेल्या दोन वर्षात होताना दिसत नाही. नागरी समस्यांना मोठ्या प्रमाणावर नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर जीआर काढून नव्या नगरपालिकेचे काम सुरु करावे.
– संदीप हरपाळे, अध्यक्ष हवेली, भाजप