पुणे : पुण्यातील ससून रुग्णालय हे देशातील एक मोठे सरकारी रुग्णालय आहे. या रुग्णालयात गोरगरीब जनता उपचार घेण्यासाठी येत असते. हे शासकीय रुग्णालय असल्याने येथील कागदपत्रे शासकीय कामासाठी व शासनाच्या विविध योजनांसाठी ग्राह्य धरली जातात. याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होत असतो. मात्र, येथील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना छोट्या-छोट्या कामांसाठी दोन ते तीन हेलफाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
ससून वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात एक अधीक्षक, 4 निवासी वैद्यकीय अधिकारी, दोन लिपिक, दोन शिपाई, मदतनीस व गार्ड असा स्टाफ कार्यरत आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कार्यालयात नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. या रांगेत उभा असलेला एक तरुण नगर जिल्ह्यातून अपंगत्वाचे प्रमाणपत्र, तर दुसरा तरुण मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून निधी मिळावा, यासाठी सही व शिक्का घेण्यासाठी आला होता. तसेच येथे अपंग, मूकबधिर व विशेष महिला व पुरुष देखील रांगेत होते. त्याचबरोबर फिटनेस सर्टिफिकेट घेण्यासाठी महाविद्यालयातील अनेक नर्सिंगच्या विद्यार्थिनी आल्या होत्या. त्यावेळी कार्यालयातील दोन चंगू-मंगूने सर्वांची कागदपत्रे घेऊन साहेबांची सही झाली की, सांगतो. तोपर्यंत बाहेर बसा, असे सांगितले.
त्यानंतर अर्धा, एक तास झाला. मात्र, कार्यालयातून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने नागरिकांनी चंगू-मंगुला विचारणा केली असता, साहेब राऊंडला गेले आहेत. थोडा वेळ थांबा. त्यानंतर थोड्या वेळाने विचारले असता, साहेब मिटिंगमध्ये आहेत, असे सांगितले. चार तासांचा कालावधी लोटल्यानंतर पुन्हा विचारले असता, साहेब आताच जेवायला गेले आहेत. जेवण करून आले की, तुमच्या कागदपत्रांवर सह्या केल्या जातील, असे तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याने सांगितले.
दरम्यान, या चार ते पाच तासांच्या कालावधीमध्ये साहेबांना भेटून 40 ते 50 वाशिलाबाजांनी कामे करून घेतले. 30 ते 40 गोरगरीब जनता मात्र विश्वास ठेऊन बाहेरच वाट पाहत बसली. यामुळे नागरिकांसह रुग्णांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे ससून रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
या दरम्यान, साहेबांना भेटण्यासाठी नंबरवरून वादावादी झाली. यामध्ये गार्डने हस्तक्षेप केल्यानंतर हा वाद मिटला. या सर्व प्रकरणावर वैद्यकीय अधीक्षकांसह कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर यल्लाप्पा जाधव यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी फोन न उचलल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात आज सकाळी ब्रेस्ट कॅन्सरचे शिबिर होते. त्यावेळी अधीक्षक माझ्यासोबत होते. परंतु, आज अधीक्षक कार्यालयात ज्या नागरिकांची कामे झाली नाहीत, त्यांनी मला भेटून त्यांच्या समस्या सांगाव्यात. मी त्यांच्या समस्या त्वरित सोडवितो.
डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता- ससून रुग्णालय, पुणे