पिंपरी : इंद्रायणी नदीच्या पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले असून नायट्रोजनचे प्रमाण अनेक पटींनी वाढले आहे. नायट्रोजन जलचरांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याने पवना, इंद्रायणी नदीपात्रातील जलचर मरण पावत आहेत. या घटनांबाबत प्रशासनाला जाग यावी, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे लक्ष द्यावे, यासाठी पिंपळे गुरव येथील विसर्जन घाटावर विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत मृत माशांना श्रद्धांजली अर्पण केली.
दिलासा संस्था, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती, पर्यावरण संवर्धन समिती, पिंपरी-चिंचवड या संस्थांनी पिंपळे गुरवच्या गणेश विसर्जन घाटावर हा कार्यक्रम आयोजित केला होता. शहरातून वाहणारी पवना नदी असो की तीर्थक्षेत्रातील इंद्रायणी नदी, दोन्ही नद्या अतिप्रदूषित झाल्या आहेत. प्रदूषणामुळे पवना आणि इंद्रायणी दोन्ही नद्यांमधील पाणी अनेक दिवसांपासून फेसाळत आहे. परिणामी नद्यांमध्ये मृत माशांचा खच पडल्याचे चित्र दिसत आहे. इंद्रायणी नदीत वाम, मरळ, चिलापी या प्रकराचे मासे आढळत होते. १३ मार्च रोजी मृत झालेल्या माशांमध्ये देवमासेदेखील मृत पावल्याचे निदर्शनास आले आहे.
दरम्यान, इंद्रायणी नदीपात्रात ठिकठिकाणी जलपर्णी वाढली आहे. तेथे माशांना पाण्याच्या वरच्या भागात येता येत नाही. त्यामुळे मासे जलपर्णी कमी असलेल्या ठिकाणी जातात. मात्र दूषित पाणी, ऑक्सिजनचे प्रमाण कमी तसेच नायट्रोजनचे प्रमाण अनेकपटींनी वाढले आहे. हा नायट्रोजन जलचरांच्या आरोग्यासाठी धोकादायक असतो. नायट्रोजनमुळे पाण्यात मासे तडफडून मृत पावत आहेत.
पाण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. नागरिकांनीही पाणी प्रदूषित होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी. माशांच्या अनेक जाती पाण्यातील विषारी घटक खात असतात. विषारी घटकांचे प्रमाण खूप वाढल्याने माशांच्या जाती नामशेष होऊ लागल्या आहेत. त्यामुळे जलचरांप्रती प्रत्येकाने सद्भावना व्यक्त करणे आवश्यक असल्याचे मत श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आले.
यावेळी पर्यावरण अभ्यासक तानाजी एकोंडे, नारायण कुंभार, सुरेश कंक, अण्णा जोगदंड, सुभाष चव्हाण, ईश्वर चौधरी, सागर पाटील, राम डुकरे, श्रीकांत चौगुले, राजेंद्र पगारे, कैलास बहिरट, रवींद्र कंक, शामराव सरकाळे, अरुण परदेशी, कुमार भरत, शंकर कुंभार, सुभाष चव्हाण, अरुण पवार, रवींद्र तळपाळे, प्रकाश घोरपडे, अशोक गोरे, योगिता कोठेकर, संगीता झिंजुरके, नारायण कुंभार, जयश्री गुमासे, चांगदेव गरजे, बाळासाहेब साळुंखे, संजय गमे, मुलानी महम्मद शरीफ, प्रकाश वीर, प्रकाश बांडेवार, मुरलीधर दळवी, रामराव दराडे, शंकर नानेकर आदी उपस्थित होते.