पुणे : महावितरण विभागाकडून नवे प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यातील दोन कोटी ४१ लाख ग्राहकांचे पारंपारिक मीटर काढले जाणार असून, त्याऐवजी प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. पुणे जिल्ह्यात तब्बल २९ लाख मीटर बसवण्यात येणार आहेत.
पुणे परिमंडलांतर्गत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह वेल्हे, हवेली, मुळशी, आंबेगाव, जुन्नर, खेड व मावळ तालुक्यांमध्ये सुमारे २९ लाख प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार असल्याची माहिती महावितरण विभागाकडून देण्यात आली. सध्या राज्यभरात सर्वच ठिकाणी साधारण मीटर वापरले जात आहे. पण आता स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याची तयारी केली जात आहे.
स्मार्ट मीटर बसवल्यावर वीज ग्राहक मोबाईल फोनप्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीज वापरू शकतात. विजेसाठी किती खर्च करायचा?, हे ग्राहकांना निश्चित करता येईल. किती वीज वापरली, याची माहिती नियमितपणे मोबाईलवर मिळणार आहे.
प्रीपेड मीटरला खर्च किती?
वीज ग्राहकांना नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर मिळणार आहे. पण या स्मार्ट मीटरसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. हे मीटर पूर्णत: मोफत मिळणार आहे. या मीटरचा खर्च केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदान आणि महावितरण विभागाकडून करण्यात येणार आहे.
आधीच भरावे लागणार पैसे
सध्या आपण वापर केलेल्या वीजेनुसारच वीज बिल आकारले जात होते. पण हे देयक वापर केल्यानंतरच यायचे. मात्र, आता हे नवे स्मार्ट मीटर असून, प्रीपेड असणार आहे. म्हणजेच वापर करण्यापूर्वीच पैसे भरून तेवढ्याच रकमेची वीज वापरता येणार आहे.