वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील सणसर येथे वालचंदनगर पोलिसांनी पळून जाणाऱ्या आरोपीला सिनेस्टाईल पाठलाग करुन ताब्यात घेतले आहे. दिपक मारुती माने, (वय-२६, रा. सणसर) असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
वालचंदनगर पोलिस ठाण्यामध्ये १७ ऑगस्ट २०२४ रोजी मारामारी व अॅट्रॉसिटींतर्गत दिपक माने याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासुन तो फरार होता. आज सोमवार (ता. ७) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सणसर ग्रामपंचायत कार्यालयाच्या जवळील बाजार तळावर बसला असल्याची माहिती वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे डुणगे यांनी तातडीने माने याला पकडण्यासाठी पथक पाठवले.
दरम्यान, पोलिस आल्याची चाहूल लागताच माने हा सणसरच्या ओढ्याच्या पुलावरुन पळून जात असताना पाण्यामध्ये उडी मारली. वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार शैलैश स्वामी, अजित थोरात, गुलाब पाटील, यांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन ओढ्यामध्ये उड्या मारुन माने याला ताब्यात घेत अटक केली. उद्या मानेला न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.