पुणे : मोक्का प्रकरणात न्यायालयाने दोन वर्ष तडीपार केले असतानाही टोळीला घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चुहा गँगला भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडले आहे. तौसिफ जमीर सय्यद ऊर्फ चुहा (वय-२८, रा. संतोषनगर, कात्रज), सुरज राजेंद्र जाधव (वय-३५, रा. रुपचंद तालीमसमोर, मंगळवार पेठ, ता. करमाळा, जि. सोलापूर), मार्कस डेव्हिड इसार (वय-२९, रा. रघुनंदन अपार्टमेंट, धानोरी), कुणाल कमलेश जाधव (वय-२५, रा. प्रसाद रेसिडेन्सी, सोमनाथनगर, वडगाव शेरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. जनाब (रा. कॅम्प) हा पळून गेला आहे.
याबाबत पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कात्रजमधील संतोषनगर येथील डिलाईट बेकरीसमोर रविवारी पहाटे चारच्या सुमारास घडला आहे. तौसिफ ऊर्फ चुहा याच्याविरुद्ध दंगली, दरोडा, जबरी चोरी सारखे अनेक गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुहाला २०२० मध्ये एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले होते. तेथून सुटून आल्यानंतरही त्याची गुन्हेगारी सुरुच राहिली. त्यानंतर तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्याच्याविरुद्ध मोक्का कारवाई केली होती. या गुन्ह्यात विशेष न्यायाधीश व्ही आर कचरे यांनी ६ नोव्हेबर २०२३ पासून दोन वर्षाकरीता चुहाला तडीपार केले होते. असं असतानाही तडीपारीचा भंग करुन पुणे शहरात आला होता.
कात्रज परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत आपल्या साथीदारांसह तो लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी टोळीला घेरुन चौघांना पकडले. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काडतुस व मॅफेड्रॉन, कोयता, डिजिटल वजन काटा, सुतळी, स्क्रु ड्रायव्हर असे साहित्य मिळून आले. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर करीत आहेत.