संतोष पवार
पळसदेव : टाळमृदुंगाचा गजर आणि विठुनामाचा जयघोष करीत पळसदेव नगरीत चौरंगीनाथ महाराजांच्या पालखीचे भक्तीमय वातावरणात फटाक्यांची आतिषबाजी व तोफांची सलामी देत जंगी स्वागत करण्यात आले.
पळसदेव नगरीत श्री चौरंगीनाथ महाराजांच्या पालखीचे आगमन होताच ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच अंकुश जाधव, माजी सरपंच आजिनाथ पवार, ग्रामपंचायत सदस्य तथा कर्मयोगीचे संचालक भूषण काळे, उपसरपंच कैलास भोसले, शरद काळे, मेघराज पाटील, सुजित मोरे, संतोष काळे, महेंद्र काळे, दादा शिंदे पळसदेवचे पोलीस पाटील अनिल कुचेकर, एकनाथ शेलार, ग्रामपंचायत कर्मचारी विठ्ठल वागजकर आणि उपस्थित ग्रामस्थांच्या हस्ते पालखीचे विधिवत पूजन करून स्वागत करण्यात आले.
त्यानंतर हजारो भाविक भक्तांसह पालखी सोहळा गावातील मुख्य बाजारपेठेतून वाजत गाजत श्री पळसनाथ मंदिरात, प्राथमिक शाळा व पळसनाथ विद्यालय येथे विसाव्यासाठी मुक्कामी थांबला. चौरंगीनाथाच्या दिंडी सोहळ्यात आलेल्या भाविकांना पळसदेव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी ईशा बंगेरा, प्रीती रेड्डी, सुनील आखाडे, अश्विनी लेंडी, रेखा खेकाळे, वसंत अडवाल, विजय जाधव यांच्या वतीने ओषध गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. रात्री कीर्तन भजन नामस्मरणाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी पळसदेव येथील ग्रामस्थ भाविकांनी पालखीचे दर्शन घेऊन कीर्तनाचा लाभ घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी पालखी पुन्हा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली.