पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कारवाईंचा धडाका सुरूच आहे. मेफेड्रोन ड्रगतस्करीचे आंतराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्त केल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हेशाखेने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आणखी एक मोठी कारवाई केली आहे. पुणे शहरात केमिकल ताड़ी तयार करण्यासाठी लागणारे केमिकल पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. संगमनेर येथील कारखान्यातून तब्बल २ हजार ३०० किलो क्लोरल हायड्रेट पावडर जप्त करण्यात पुणे पोलिसाना यश आलं आहे. त्या पावडरची किंमत जवळपास ६० लाख रुपयांच्या घरात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पुणे शहरात बनावट ताडी तयार करण्यासाठी लागणारे केमिकल विक्री होत असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी थेट कारवाई करत दोघांना अटक केली आहे. निलेश विलास बांगर (वय 40, रा- पिंपळगाव खडकी, कुरकुटे मळा, मंचर, ता. आंबेगाव), प्रल्हाद रंगनाथ भंडारी (वय 60, रा केशवनगर, मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. तसेच त्यांच्याकडून केमिकल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
सातवी पास व्यक्तीचा कारखाना पोलिसांनी असा केला उध्वस्त
पुण्यातील मुंढवा येथील आरोपी प्रल्हाद भंडारी याच्याकडे क्लोरल हायड्रेड साठा पोलिसांना सापडला. यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता. नीलेश बांगरने हा माल पुरवल्याचं समोर आलं. त्यानंतर पुणे पोलिसांनी आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खंडकीत असलेल्या घरावर थेट छापा टाकला. या छाप्यात केमिकलचे १४२ किलो ७५० ग्रॅम वजनाचे ५ पोते असा २ लाख ९५ हजार रुपयांचा माल जप्त केला.
पुणे पोलिसांनी या प्रकरणाच्या खोलात जाऊन पर्दापाश करण्याचा निर्णय घेत तपास सुरु केला. या तपासात क्लोरल हायड्रेड रसायन पावडर तयार करण्याचा अवैध कारखाना सांगमनेर येथील वेल्हाळे येथे बांगरने सुरु केल्याचं समोर आलं. पुणे क्राईम ब्रांचने वेल्हाळे गाठून छापा टाकला. यात २२१७ किलो तयार क्लोरल हायड्रेड आणि तयार करण्यासाठी लागणारे उपकरणं असा एकूण ६ लाख रुपयांचा माल जप्त केला केला.
ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, सुनिल तांबे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या पथकाने केली.