लोणी काळभोर : शालेय विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धत समजून देण्याच्या उद्देशाने लोणी काळभोर (ता.हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमध्ये ‘बालसंसद’ उपक्रमांतर्गत नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली.
शालेय मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या विद्यालयात पाचवी ते दहावीपर्यंत एकूण तेराशे विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया समजावी, यासाठी ‘बालसंसद’अंतर्गत ज्येष्ठ शिक्षक शशीराव शेंडगे व अन्सार पिरजादे यांनी विविध समित्यांची रचना केली. त्यात प्रामुख्याने निवडणूक समिती, आचारसंहिता समिती, चिन्ह वाटप समिती व इतर समित्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष कार्य सुरू केले. तारखेनिहाय कार्यक्रमाचे नियोजन केले.
इतकेच नाहीतर तीन दिवस आचारसंहिता ठरली. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून विद्यालयाचे प्राचार्य सिताराम गवळी व उपायुक्त म्हणून शशीराव शेंडगे तसेच निवडणूक निर्णय अधिकारी विलास शिंदे व अन्सार पिरजादे, चिन्ह वाटप समिती मधुकर केंद्रे, मतदार यादी तयार करण्यासाठी शुभांगी धिमते यांनी काम पाहिले.
या बाल संसद निवडणुकीस झोनल अधिकारी ज्येष्ठ शिक्षक दयानंद जानराव, तालुका अधिकारी कल्पना बोरकर मतमोजणी अधिकारी सीमा तिडके व मधुबाला काळभोर, शर्मिला साळुंखे, राहुल गाट, रोहन साठे यांनी काम पाहिले.
100 मतदारांची ‘नोटा’ पसंती
प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडली असता इयत्ता दहावी ब चा विद्यार्थी राज प्रशांत काळभोर मुख्यमंत्री म्हणून निवडून आला. त्याला 1200 पैकी 800 मते मिळाली. तर उपमुख्यमंत्री म्हणून सिद्धांत विनोद शेंडगे इयत्ता दहावी ई चा विद्यार्थी याला 600 मते मिळाली. एकूण 1200 मतांपैकी हजार मते वैध होती तर 100 मते अवैध ठरली. 100 मतदारांनी नोटा करणे पसंद केले.
शालेय मंत्रिमंडळाची स्थापना
मुख्यमंत्री निवडणुकीनंतर 11 सदस्य शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. सर्वांच्या साक्षीने शपथविधी झाला. यामध्ये अर्थमंत्री उदयन प्रभाकर वाकसे (दहावी अ), आरोग्यमंत्री वैष्णव संजय सानप (दहावी अ), पर्यटनमंत्री युवराज दत्तात्रय चव्हाण (दहावी अ), क्रीडामंत्री ओंकार संजय खंडाळे (दहावी ई), स्वच्छतामंत्री रेहान फिरोज शेख (दहावी ड), विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री प्रणव विजय महाडिक (दहावी ई), वनमंत्री प्रतीक भास्कर जाधव (दहावी ड), शिक्षणमंत्री ओंकार सतीश बिक्कड (आठवी ब), सांस्कृतिक मंत्री ओम राजू यादव (नववी ई) अशा पद्धतीने मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली.
वरिष्ठांसोबत पहिली बैठक, जबाबदाऱ्याही ठरल्या
निवडणूक उपायुक्त शशीराव शेंडगे निवडणूक अधिकारी अन्सार पिरजादे तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक विलास शिंदे यांच्यासमवेत पहिली बैठक झाली. त्यामध्ये जबाबदाऱ्या ठरल्या. शालेय विकासामध्ये भर गुणवत्ता वाढ करणे यावर चर्चा झाली. ‘बालसंसद’ या उपक्रमात निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे प्राचार्य सिताराम गवळी यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.