शिरूर : मुले ही फुलाप्रमाणे निरागस असतात. ती सुंगधाप्रमाणे समाजात दरवळतात. त्यांना लहान वयात दिलेली शिकवण ही जीवन घडवणारी ठरते. मुलांचे लहान वय हा त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात कोणत्या गोष्टी योग्य आहेत आणि कोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत हे शिकवण्याचा सर्वोत्तम काळ आहे. त्यासाठी पालकांनी मुलांना बालवयातच जीवन, संस्कृतीचे ज्ञान देऊन जगण्याचा योग्य मार्ग शिकवावा, असे मत समन्वयक वैशाली चव्हाण यांनी व्यक्त केले.
निर्वी (ता. शिरूर) येथील तात्यासाहेब खंडेराव सोनवणे हायस्कूलमध्ये कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाऊंडेशन अंतर्गत ‘शुभेच्छा आणि कृतज्ञता’ या विषयावर त्या बोलत होत्या. या वेळी शुभांगी मैड, ज्ञानेश ब्राम्हणे, ललिता पोळ, माधुरी कोरेकर, कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाऊंडेशनचे अधिकारी व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
तर्डोबाची वाडी, निमोणे, कोळगाव डोळस या ठिकाणच्या प्राथमिक शाळांमध्ये कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाऊंडेशनअंतर्गत करुणामय नाताळ व नवीन वर्षाच्या कृतज्ञतापूर्वक शुभेच्छा देण्यासाठी मुलांना शुभेच्छा पत्रांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
चव्हाण म्हणाल्या की, गावातील दानशूर ग्रामस्थ गावच्या विकासासाठी सढळ हस्ते मदत करतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन, शुभेच्छापत्र देण्यात येणार आहे. मुलांच्या मनात मदत करणाऱ्या हातांविषयी आदरभाव निर्माण व्हावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गोलेगाव प्राथमिक शाळा, शिवाजी विद्यालय गोलेगाव, श्री दत्त माध्यमिक विद्यालय, गुणाट या सर्व ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमात सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.