लोणी काळभोर : महामार्गावर वाहतुकीचे नियम न पाळल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होतात. हे अपघात रोखण्यासाठी आपण सर्वांत आधी स्वत: नियम पाळले पाहिजेत. ही तर लहान मुलं आहेत. हेच आपल्या देशाचे उद्याचे भवितव्य आहेत. त्यामुळे त्यांना आतापासूनच वाहतूक नियम पाळण्याची सवय लागली पाहिजे. तरच मुले आगामी काळात समाजात चांगले कार्य करतील व चांगला समाज घडवतील, असे प्रतिपादन लोणी काळभोर वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक रामदास जाधव यांनी केले.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुलमधील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची बालपणापासूनच माहिती व्हावी, यासाठी गुरुवारी (ता. ११) मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रामदास जाधव बोलत होते. या वेळी पोलीस हवालदार चेतन सुलाखे, सचिन ओव्हाळ, ज्ञानेश्वर बडे, राजेश पवार, एमआयटी विश्वशांती गुरुकुलच्या प्राचार्या शिल्पा जेजुरकर, शिक्षिका ज्योती शितोळे, शितल काळभोर, अनुपमा गायकवाड, अश्विनी मोरे, इशानी, वैशाली मोरे, शांतीदेवी बघेल व पूर्व प्राथमिक गटातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाहतूक पोलिसांनी मुलांना वाहतुकीचे नियम, वाहतुकीच्या खुणा, हेल्मेट का वापरावे, मद्य पिऊन गाडी का चालवू नये, रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी प्राधान्य कसे द्यावे, सिग्नलचा उपयोग, झेब्रा क्रॉसिंगचे फायदे अशा अनेक बाबी समजावून सांगितल्या. त्याचबरोबर वाहतूक नियम मोडल्यावर किती रुपयांचा दंड होतो, कोणती शिक्षा होते, याबाबत माहिती दिली. १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय वाहन चालवता येत नाही. मोटर वाहन चालवताना कोणत्या वाहतूक नियमांचे पालन करायचे. तसेच घरातील, नातेवाईक, शेजारी यांना वाहतुकीचे नियम पाळायला लावायचे, याबाबत पोलिसांनी चिमुकल्यांना हसत-खेळत माहिती दिली.
दरम्यान, एमआयटी विश्वशांती गुरुकुलच्या प्राचार्या शिल्पा जेजुरकर यांनी लोणी काळभोर वाहतूक विभागाशी संपर्क साधून, शालेय विद्यार्थांना वाहतूक नियमाचे धडे देण्याची मागणी केली होती. याची दखल घेऊन लोणी काळभोर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक घाडगे यांनी मुलांना वाहतुकीचे नियम सांगून जनजागृती केली. एमआयटी विश्वशांती गुरुकुलच्या वतीने शिक्षिका ज्योती शितोळे यांनी वाहतूक पोलिसांचे आभार मानले.