पुणे : पुणे शहरात अलीकडे बाल गुन्हेगारांचे प्रमाण वाढले आहे. बाल गुन्हेगारीचा आढावा घेतला असता, असे निदर्शनास आले की सध्या बाल गुन्हे गारांकडून वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत. बहुतांश गंभीर गुन्ह्यांमध्ये बाल गुन्हेगारांचा सहभाग पोलिसांना आढळून आला आहे. बाल गुन्हेगारांकडून होत असलेल्या गंभीर गुन्हेगारीला रोखण्यासाठी पुणे पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी आज रविवारी ७ जानेवारी रोजी बाल गुन्हेगारांचा व त्यांच्या पालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला.
हडपसर विभागातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनकडून एकूण 68 बाल गुन्हेगारांचा व 67 पालकांचा मेळावा घेण्यात आले. त्या मेळाव्याला जास्तीत जास्त बाल गुन्हेगार व पालकांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवावा व त्यांचे काउन्सिलिंग करून घ्यावे असे आदेश देण्यात आले आहेत.
या मेळाव्यात गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून व त्यांचे मन परावृत्त करणे आणि समुपदेशन करणे हा महत्त्वाचा मुद्दा होता. इयत्ता १०वी, १२वी शिक्षण घेत असलेल्या बाल गुन्हेगारांना त्यांच्या पुढील भविष्यात शिक्षण किती महत्त्वाचे आहे, हे सांगण्यात आले आहे. याबाबत माहिती व जनजागृती करण्यात येणार आहे.
हा मेळावा पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०५, पुणे शहर, आर राजा, यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनांप्रमाणे परिमंडळ-५ चे विभागीय सहा. पोलीस आयुक्त, शाहुराजे साळवे, वानवडी विभाग, पुणे शहर व अश्विनी राख, हडपसर विभाग, पुणे शहर यांनी व त्यांचे विभाग पो.स्टे. कडील प्रभारी अधिकारी व बाल स्नेही अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.