पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात जुन्या भांडणाचा राग मनात धरुन चार जणांच्या टोळक्याने एका अल्पवयीन मुलावर धारदार हत्याराने वार केल्याची घटना घडली आहे. तसेच त्याच्या दुचाकीवर दगड मारुन नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी २५ फेब्रुवारीला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हडपसर येथील शिंदेवाडी पुलावर घडली आहे.
याबाबत शिंदेवस्ती येथे राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन मोहसीन उर्फ अमन मुजावर, अकरम शेख, वसीम मुजावर, गोल्ड्या (सर्व रा. शिंदेवस्ती, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये पूर्वी किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. याचा राग मनात धरून रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शिंदेवाडी पुलावरुन त्याच्या दुचाकीवरून जात होता. त्यावेळी आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन फिर्यादी याला शिवीगाळ करुन हाताने आणि धक्काबुक्की करुन मारहाण केली.
आरोपी गोल्ड्या याने त्याच्या जवळ असलेल्या धारदार शस्त्राने फिर्यादी याच्या डाव्या दंडावर वार करुन जखमी केले. तसेच इतर आरोपींनी फिर्यादी याच्या दुचाकीवर दगड मारून दुचाकीचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.