Chikhali Crime | पुणे : कर्जफेड न केल्याने बँकेकडे गहाण असलेल्या मिळकतीवर बँकेने ताबा मारला. असे असताना देखील एका दाम्पत्याने बेकायदेशीरपणे घरात अतिक्रमण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय नारायण पवार आणि त्यांच्या पत्नी विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी महेंद्रसिंग भाऊसिंग जगताप (वय 50, रा. चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एनकेजीएसबी बँकेकडून कर्ज काढले आहे. या कर्ज प्रकरणामध्ये आरोपींनी राजे शिवाजीनगर येथील एक मालमत्ता तारण ठेवली होती.
आरोपींनी वेळेत कर्जफेड न केल्यामुळे बँकेने कायदेशीर प्रक्रिया करून सदर मिळकतीवर ताबा मारला. हा प्रकार माहिती असूनही आरोपींनी बेकायदेशीरपणे सीलबंद कुलूप तोडून मिळकतीत प्रवेश केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.