पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. या सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मोठे अपडेट दिले आहेत. ‘उद्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल’, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितल्यामुळे उद्याच्या अधिवेशनात कोणता निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती ढासळत असल्यामुळे राज्यभर आंदोलने सरू आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने उद्या (ता. २० फेब्रुवारी) रोजी विशेष अधिवेशन बोलावले आहे. मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल अधिवेशनात मान्य केला जाणार असून, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे यांनी सगेसोयरे अध्यादेश उद्याच्या अधिवेशनात मान्य करून, त्याचे कायद्यात रुपांतर करण्याची मागणी केली आहे. स्वतंत्र आरक्षण यापूर्वी देखील देण्यात आले आणि ते न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे पुन्हा असेच झाल्यास आम्हाला लढा द्यावा लागणार आहे. त्यामुळे सगेसोयरे अध्यादेशाचाच कायदा केल्यास त्याचा अधिक फायदा मराठा समाजाला होईल आणि न्यायालयात देखील टिकेल असे जरांगे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “शिवाजी महाराजांनी धर्म किंवा पंथ यांचा विचार न करता स्वराज्य स्थापन केले. छत्रपती म्हणजे नियतीला पडलेले सुंदर स्वप्न आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नौदलाच्या झेंड्यावर शिवाजी महाराजांचे शिल्प लावले. युनोस्कोमधे ११ गड किल्ल्यांची नोंद झाली ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी दांडपट्टा हा राज्याचा खेळ म्हणून जाहीर केला आहे.