मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार याची जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक महत्वाच विधान केलं आहे. ”विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्र बसू, ज्यांचे आमदार जास्त त्या पक्षाला मुख्यमंत्रिपदासाठी आम्ही पाठिंबा देऊ. तशी माझ्या पक्षाची भूमिका आहे, असं विधान शरद पवार यांनी केलं आहे.
शरद पवार यांनी एका मराठी माध्यमाला मुलाखत देताना हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस हे काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे.
दरम्यान, विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. तसेच महाविकास आघाडीचा जो कोणीही उमेदवार असो, त्याच्या पाठीशी आपण ठाम उभे राहू असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते. तर उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा अशी भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली होती. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केली नव्हती.
तसेच, लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठं यश मिळाल्यानंतर त्या पक्षाच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढल्याचं दिसून आलं. त्यामुळे ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री अशी भूमिका काँग्रेसमधील काही नेत्यांनी घेतल्याची चर्चा होती. मात्र, असं केल्यास मित्रपक्षांमध्ये आपले आमदार जास्त निवडून आणण्यासाठी सहकारी पक्षाचे आमदार पाडण्याची स्पर्धा लागू शकते, असं ठाकरे गटाने स्पष्ट केल होतं.