पुणे : रामजन्मभूमी- बाबरी मशीद वादावर मार्ग काढण्यासाठी मी दैनंदिन जीवनात दररोज पूजा करायचो, त्यामुळे मी देवांपुढे बसून त्यांनाच यातून मार्ग शोधून द्या, अशी प्रार्थना केली. आपला विश्वास, आस्था असेल तर देव नेहमी आपल्याला मार्ग शोधून देतो, असे वक्तव्य देशाचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी एका कार्यक्रमात केले.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी (दि.20 ऑक्टोबर) रोजी पुण्यातील खेड तालुक्यातील कनेरसर या त्यांच्या मूळ गावी भेट दिली. कनेरसर ग्रामस्थांनी यमाई मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात त्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्या. ए.एस.सय्यद, न्या.एस.बी.पोळ, न्या.एस.बी.पवार, उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. चंद्रचूड म्हणाले, “पूर्वजांच्या पुण्याईमुळे मी इथवरचा प्रवास करू शकलो आणि यमाई देवीच्या कृपेने मी भारताचा सरन्यायाधीश झालो. न्यायालयात काम करत असताना कित्येक वेळा अशी प्रकरणं समोर येतात जी सोडवणं अवघड असतं. माझी अशीच काहीशी स्थिती अयोध्या प्रकरणाचा निकाल देताना झाली होती. आयोध्या खटला माझ्यापुढे चालू होता. तीन महिने आम्ही त्यावरील सुनावणी करत होतो. शेकडो वर्षे जो वाद कोणी सोडवू शकलं नव्हतं, तेच प्रकरण आमच्या पुढे येऊन ठेपलं होतं. त्यावेळी यातून मार्ग कसा शोधायचा? असा प्रश्न आम्हाला पडला होता. त्यामुळे मी या खटल्याचा निकाल देण्यापूर्वी देवाकडेच प्रार्थना केली आणि मार्ग निघाला.”