पुणे : पुण्यातील नऱ्हे परिसरात चिकनशॉप चालकाने नागरिकांवर आणि पोलिसावर थेट कोयत्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नऱ्हे गावात हा प्रकार घडला आहे. चिकन शॉप परिसरात थोडावेळ भीतीचे वातावरण पसरले होते. या हल्ल्यात पोलीस आणि नागरिक जखमी झाले आहेत. ही घटना पुण्यातील नऱ्हे गावात घडली आहे. वेळीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, २२ जानेवारीला चिकनशॉप चालक हातात कोयता घेऊन परिसरात फिरत होता. त्याने परिसरात गोंधळ घालण्याचाही प्रयत्न केला आणि दहशत निर्माण करण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र त्यावेळी त्याने कोणाला काहीही केलं नाही.
दरम्यान २३ जानेवारीला त्याचं डोकं फिरलं आणि थेट त्याने नऱ्हे गावातील नागरिकांवर हल्ला चढवायला सुरु केलं. यावेळी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत राडा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र चिकन शॉप चालकाने पोलिसांवर देखील हल्ला केला. यामध्ये २ पोलीस आणि नागरिक जखमी झाले आहेत. पोलीसांनी चिकन शॉप चालकाला ताब्यात घेतलं आहे.
या प्रकारामुळे नऱ्हे गावात मोठी खळबळ उडाली होती. या गोंधळामुळे अनेक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी व्हिडीओ काढायला सुरुवात केली. हे पाहून चिकन शॉप चालक पुन्हा चिडला आणि त्याने थेट बघ्यांवर हल्ला करायला सुरुवात केली होती. भरदिवसा झालेल्या या हल्ल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.