सागर जगदाळे
भिगवण, (पुणे) : छत्रपती शिवराय यांसारखी दाढी, कानात बाळी व कपाळावर चंद्रकोर लावून छत्रपती शिवराय होता येत नाही, तर वर्षातील ३६५ दिवस त्यांचे आचरण करावे लागते असे प्रतिपादन पुणे येथील व्याख्याता शिवकन्या अर्चना भोर यांनी व्यक्त केले.
भिगवण (ता. इंदापूर) येथे अखिल भारतीय मराठा महासंघ भिगवण शाखा संचलित छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शिवजयंती निमित्त बुधवारी (ता. १५) रत्नदीप कॉम्प्लेक्स येथे राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेतील द्वितीय पुष्पप्रसंगी भोर बोलत होत्या.
यावेळी दौंड तालुक्यातील मळद येथील सरपंच व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पदी निवड झालेल्या एड. मोहिनी बापूराव भागवत अध्यक्ष म्हणून तर अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हा उत्तर च्या महिलाध्यक्षा शैलजा दुर्गे व पुणे शहर महिलाध्यक्षा सुचिताताई पाडुळे या प्रमुख पाहुण्या म्हणून यावेळी उपस्थित होत्या. या पुष्पाचे प्रायोजकत्व ग्रामपंचायत भिगवण, दत्तकला शिक्षण संस्था स्वामी चिंचोली च्या सचिव मायाताई झोळ, भिगवण येथील एच.पी. आईस फॅक्टरी च्या प्रोप्रायटर हेमाताई माडगे व वाघ ॲग्रोटेक भिगवणच्या प्रोप्रायटर संध्या विकास वाघ यांनी स्वीकारले होते.
यापुढे बोलताना भोर म्हणाल्या, “छत्रपती शिवरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी पहिला तोरणा किल्ला बांधला. आजचा युवक मात्र सोळाव्या वर्षाच्या परिणामाचा बळी ठरत आहे. राज्यातील जनतेची दयनीय अवस्था पाहून राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी भवानी मातेला साकड घातलं व राजे श्री शिवछत्रपती जन्माला आले. त्या राज्यांचे चरित्र माणसाला माणूस जगताना संस्काराचा पाया घालण्याकरता महत्वपूर्ण ठरते.”
जिजाऊंच्या कर्तृत्व आणि इतिहासाचा अभ्यास करून त्यानुसार जिजाऊंसारखे वागण्याचा प्रयत्न केले तरच जिजाऊंचे आचरण केल्यासारखे होईल. या जगात आईबाप सोडलं तर दुसरे कोणीही श्रेष्ठ नाही. राजमाता जिजाऊ तसेच शहाजीराजांचे पात्र हातात घ्या आणि चांगले संस्कार देण्याचे प्रयत्न करा. आई-बाबांची सेवा करा हेच शिवचरित्रात सांगितले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भागवत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्याख्यानमालेचे महत्त्व विशद करून महासंघाच्या कार्याचा गौरव केला.
दरम्यान, शिवजयंतीच्या निमित्ताने मराठा महासंघ भिगवण शाखेच्या वतीने देण्यात येणारा ‘राजमाता जिजाऊ भूषण पुरस्कार’ भिगवण येथील लक्ष्मीबाई गंगाराम चौधरी यांना प्रदान करण्यात आला. दीपप्रज्वलन व मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिगवण शहर महिलाध्यक्ष सुचिता साळुंखे यांनी केले तर वंदे मातरम पांडुरंग वाघ यांनी सादर केले.