राहुलकुमार अवचट / यवत : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने होणार्या 23 व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी बारामती शहर सज्ज झाले असून 15 ते 19 जानेवारी 2025 कालावधीत रेल्वे मैदान बारामती येथे कबड्डीचा थरार रंगणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी दिली आहे.
ऑलिम्पिकपटू स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली 15 जानेवारी रोजी सांयकाळी 6 वाजता होणार आहे, यावेळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे.
राज्यातील कबड्डी खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेत खेळण्याची संधी प्राप्त व्हावी, कबड्डी क्रीडाप्रेमी, प्रेक्षकांना दर्जेदार खेळाडूंचा खेळ व त्यांचे कौशल्य बघता यावे, याकरीता राज्य शासनामार्फत राज्यस्तरीय पुरुष व महिलांसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धे’चे आयोजन करण्यात येते. बारामती शहर व परिसरात कबड्डी खेळाची विविध अद्ययावत प्रशिक्षण केंद्रे असून यामधून विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू घडलेले आहेत. बारामती शहराला सन 2009-10 व आता दुसऱ्यांदा या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा बहुमान मिळाला आहे.
जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडूंना अशा क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळावी याकरीता महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष तथा उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीने महानगरपालिका क्षेत्राला जिल्ह्याचा दर्जा देण्यात येऊन शहर व जिल्हा संघ सहभागी होईल असा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातून पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे जिल्हा असे एकूण 3 संघ सहभागी होणार आहे.
सन 2024-25 मध्ये आयोजित होणारी स्पर्धा ही साखळी व बाद फेरी पद्धतीने खेळविली जाणार असून 15 ते 19 जानेवारी 2024 या कालावधीत सांयकाळी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत रेल्वे मैदानावार प्रकाशझोतात सामने होणार आहेत. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 19 जानेवारी 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित राहणार आहेत. उद्धाटन व पारितोषिक वितरण समांरभांप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, राज्यातील प्रादेशिक नृत्ये व संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय फटाक्यांची आतषबाजी व नेत्रदीपक लेझर शो होणार आहे.
बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या 23 व्या छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेस जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, क्रीडासंस्था, क्रीडासंघटना, क्रीडामंडळांनी उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह द्विगुणीत करावा तसेच दर्जेदार कबड्डी खेळाचा आनंद घ्यावा.
जितेंद्र डुडी, छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजन समितीचे कार्याध्यक्ष तथा जिल्हाधिकारी