पुणे : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी आणि हक्कांसाठी छगन भुजबळ आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे.
पुण्यातील शासकीय विश्रामगृहात स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राडा केला आहे. स्वराज्य संघटनेच्या सरचिटणीस धनंजय जाधव यांनी शासकीय विश्रामगृहात जाऊन छगन भुजबळांना थेट इशारा दिला आहे. ‘छगन भुजबळ यांनी सबुरीने घ्यावे, अन्यथा त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. आमच्या आंदोलनाला नख लावण्याचे काम करू नका, वेळ पडली तर भुजबळांची गाडीही फुटू शकते’, असा इशारा धनंजय जाधव यांनी दिला.
पुण्यातील शासकीय विश्रामगृहात छगन भुजबळ पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेत असताना स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी धनंजय जाधव यांनी छगन भुजबळ यांच्या गाडी जवळ येऊन त्यांना आव्हान दिले. धनंजय जाधव यांनी त्यांची गाडी छगन भुजबळ यांच्या गाडीशेजारी लावली व दोन्ही गाड्यांमधील अंतर दाखवले.
गाडी फोडण्यासाठी काही वेळ लागणार नाही असा इशाराही दिला. दरम्यान, जाधव म्हणाले की, राज्यात ओबीसी-मराठा वाद होऊ नयेत, अशी छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका आहे. आमची देखील तीच भूमिका आहे. मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे. भुजबळ, तायवाडे फूट पाडत आहेत. मराठा समाजातील नेत्यांना हातपाय तोडण्याची धमकी दिली जात आहे. आम्ही फक्त इशारा दिला आहे. कृती करण्यासाठी आम्हाला वेळ लागणार नाही, असे धनंजय जाधव म्हणाले. त्यावेळी जाधव यांना पोलिसांनी गेटच्या बाहेर काढले. या वेळी ओबीसी कार्यकर्ते आक्रमक झाले.
दरम्यान, धनंजय जाधव यांच्या धमकीनंतर भुजबळांचे समर्थक देखील आक्रमक झाले. छगन भुजबळांच्या समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भुजबळांची गाडी फोडण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्यांचा ओबीसी परिषदेच्या वतीने निषेध करण्यात आला. दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, अशी भूमिका भुजबळ समर्थकांनी घेतली.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत आरक्षणाचा प्रश्न तात्पुरता सोडवण्याचा सरकारने प्रयत्न केला. त्यानंतर छगन भुजबळ आक्रमक झाले. त्यांनी याला कडाडून विरोधक केला. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे हे ओबीसी समाजावर अन्याय करणारे असल्याचे छगन भुजबळ यांचे म्हणणे आहे. त्यासाठी त्यांनी जालना आणि हिंगोलीत दोन ओबीसी एल्गार महासभा देखील घेतल्या. भुजबळांनी आपला मुद्दा उचलून धरला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार सकारात्मक आहे. सरकार काही पावले उचलत आहे. त्यात कुणीही व्यत्यय आणू नये, अशी भूमिका मराठा समाजाची आहे. छगन भुजबळांच्या वक्तव्यांवरही त्यांचा आक्षेप आहे.