पुणे : हॉटेल मॅनेजरने पदाचा गैरवापर करून मोठी फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीला आली आहे. ग्राहकांच्या बिलाची रक्कम हॉटेलच्या बँक खात्यात जमा न करता स्वत:च्या खात्यावर घेऊन मॅनेजरने हॉटेल मालकाची तब्बल ९ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी बंडगर्डन पोलिसांनी हॉटेल मॅनेजरवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत हॉटेल मालक अभिजीत तुळशीराम कदम (वय-३८, रा. तुकाई दर्शन, भेकराईनगर, फुरसुंगी, हडपसर) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अमोल मोहन राज (रा. शांतीनगर, वानवडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत संगमवाडी येथील हॉटेल क्वॉलीटी रेस्टॉरंटमध्ये घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे संगमवाडी येथील मोतिलाल रोडवर हॉटेल क्वॉलिटी रेस्टॉरंट नावाचे हॉटेल आहे. तर आरोपी अमोल राज हा त्यांच्या हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता. आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या बिलाची रक्कम स्वत:च्या खात्यात घेतली. तसेच फिर्यादी यांना खोटा सेल रिपोर्ट पाठवला. यानंतर आरोपीने रोख रक्कम घेऊन फिर्यादी यांची ९ लाख ३ हजार ६४१ रुपयांची फसवणूक केली.
या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कदम करीत आहेत.