इंदापुर: इंदापुरामध्ये आमदार गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक करण्यात आली आहे. ओबीसी एल्गार मेळाव्यात गोपीचंद पडळकर यांनी मराठा समाजाविरोधात भाषण केल्यामुळे इंदापुरात मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. पण आम्ही ही चप्पलफेक केली नसल्याचं स्पष्टीकरण देखील मराठा समाजाकडून देण्यात आलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी मराठा आंदोलकांनी यावेळी केली. ओबीसी एल्गार मेळाव्यानंतर पडळकर हे मराठा साखळी उपोषणाजवळ आले. त्यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना विरोध केला. ज्या ठिकाणी ओबीसी एल्गार मेळावा होता, त्या ठिकाणापासून काही अंतरावर मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू आहे.
दरम्यान आमदार गोपीचंद पडळकरांवर त्यांच्याच माणसांनी चप्पलफेक केल्याचं स्पष्टीकरण मराठा समाजाकडून देण्यात आले आहे. तसेच पडळकरांचीच माणसं आमच्यावर धावून आल्याचा आरोप मराठा समाजाकडून करण्यात आला. इंदापुरात आण्णा काटे यांच्या वतीने आमरण उपोषण सुरु आहे. त्या उपोषणाला भेट देण्यासाठी पडळकर आले असल्याची माहिती समोर आली होती. पण, तिथेच दुधासाठी देखील उपोषण सुरु होते. त्यामुळे पडळकर नक्की कोणत्या उपोषणासाठी आले होते, याबाबत मात्र अद्याप संभ्रम आहे. पण आम्ही ही चप्पलफेक केली नसल्याचं मराठा समाजाने स्पष्ट केले आहे.