पिंपरी : निवडणुका झाल्यानंतर पिंपरी ते निगडीच्या विस्तारित मेट्रोमार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने चिंचवड येथील मदर तेरेसा उड्डाण पूल ते भक्ती-शक्ती चौक निगडी परिसरातील वाहतुकीत बदल केला आहे. मेट्रोकडून माती परीक्षणासाठी चिंचवड ते निगडी दरम्यान ८१ ठिकाणी लॉग बोअर घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे वाहतुकीला रस्ता अरुंद होऊन वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी निगडी वाहतूक विभागांतर्गत वाहतूक वळविण्यात आली आहे. याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्तविशाल गायकवाड यांनी आदेश दिले आहेत.
असे आहेत बदल:
भक्ती-शक्ती चौकाकडून येणारी जड, अवजड वाहने टिळक चौकाकडे न जाता भक्ती-शक्ती सर्कलवरून अंकुश चौक-त्रिवेणीनगर चौक-दुर्गानगर-थरमॅक्स चौकातून जातील.
तसेच भक्ती-शक्ती चौकाकडून येणाऱ्या लक्झरी बसेस टिळक चौकाकडून खंडोबा माळ चौकाकडे न जाता त्या भेळ चौक-संभाजी चौक मार्गे जातील. तसेच दुर्गानगर चौकाकडून येणारी जड अवजड वाहने डावीकडून खंडोबामाळ चौकाकडे न वळता सरळ भेळ चौक-संभाजीनगर चौकातून जातील.
तसेच खंडोबामाळ चौकाकडून पिंपरीकडे सर्व्हिस रोडने जाणाऱ्या जड व अवजड वाहतुकीला प्रवेश बंद असेल. तसेच टिळक चौकापासून काळभोरनगर अंडरपासपासून पुढे बीआरटीमधून जाण्यास परवानगी असेल.
तसेच भक्ती-शक्ती चौकापासून ते काळभोरनगर अंडरपासपर्यंत दोन्ही बाजूंनी ‘नो पार्किंग झोन’ असेल.