पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन रविवारी (दि. ३०) शहरात होणार असून, या सोहळ्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. पालखी आगमनानिमित्ताने शहरातील प्रमुख रस्ते दुपारनंतर वाहतुकीस बंद राहणार असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.
जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी आगमनानिमित्ताने रविवारी बोपोडी चौक, खडकी रेल्वेस्थानक, मरिआई गेट चौक, कमल नयन बजाज चौक, जुन्या मुंबई-पुणे मार्गावरून पुण्याकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी आगमनानिमित्ताने कळस फाटा ते विश्रांतवाडी चौक, येरवड्यातील मनोरुग्णालय (मेंटल कॉर्नर) ते आळंदी रस्ता चौक, चंद्रमा चौक ते आळंदी रस्ता, नवीन डॉ. आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक, होळकर पूल ते साप्रस चौकीपर्यंत वाहतूक बंद राहील. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
शहरात आगमन झाल्यानंतर दोन्ही पालख्या एकाच मार्गावरून मुक्कामस्थळी पोहोचतील. अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, संचेती चौक, वेधशाळा चौक, वीर चापेकर चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, तुकाराम पादुका चौक, गोखले स्मारक चौक (गुडलक), खंडोजी बाबा चौक, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता, विजय चित्रपटगृह चौक, सेवासदन चौक, बेलबाग चौक, बुधवार चौक, पासोड्या विठोबा मंदिर, मोती चौक, सोन्या मारुती चौक, हमजेखान चौक, डुल्या मारुती चौक, नाना पेठ पोलीस चौकी येथून श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी अरुणा चौकमार्गे श्री निवडुंग्या विठोबा मंदिर येथे मुक्कामास येईल. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी अशोका चौकमार्गे भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर येथे मुक्कामास येईल. पालख्यांच्या मुक्कामानिमित्त नाना-भवानी पेठेतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.