पुणे : राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाचा हाहाकार बघायला मिळाला आहे. त्यामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण पूर्ण भरल्यामुळे मुठा नदीमध्ये आज शुक्रवारी (दि.26) पहाटे 4 वाजता हजारो क्युसेक पाणी सोडण्यात आले. यामुळे अचानक लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. या सर्व आपत्तीग्रस्त लोकांना दिलासा मिळणारी बातमी समोर येत आहे. लवकरच पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु होतील. नागरिकांना योग्य ती मदत दिली जाईल, असे आदेश भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. नदी पात्राजवळ वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचे मोठे नुकसान झाले. अनेक पूल पाण्याखाली गेले असल्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले. अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामध्ये आपत्तीग्रस्त लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरातील सामान वाहून गेले.
यावेळी अग्निशमन दलाने आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत केली. तसेच पुण्यामध्ये जवानांचे देखील पाचारण करण्यात आले होते. पावसात अडकलेल्या लोकांना बोटीमधून बाहेर काढण्यात आले. एकतानगर, सिंहगड रोड, येरवडा, मोरया गोसावी समाधी मंदिर, खड्डा झोपडपट्टी, ताडीवाला रस्ता हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहे. याबाबत भाजप नेते आणि मंत्री चंद्रकात पाटील यांनी आढावा घेत प्रतिक्रिया दिली आहे.