पुणे : राज्यात सद्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशात उमेदवारी जाहीर झालेल्या पक्षातील अनेक उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पुण्यात देखील जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु असून कोथरुड विधानसभेसाठी भाजपकडून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोथरुड भागामध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये, फुलांची उधळण करत चंद्रकांत पाटील यांचे स्वागत करण्यात आले आहे. पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती आणि शंकर महाराज मठामध्ये जाऊन चंद्रकांत पाटील यांनी दर्शन घेतलं. पुण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करत चंद्रकांत पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी, महायुतीचे कार्यकर्ते आणि कोथरूडकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अर्ज दाखल केल्यांनतर काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
उमेदवारी अर्ज दाखल केल्यांनतर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘आजच्या रॅलीमध्ये महायुतीचे कार्यकर्ते, माता भगिनी आणि कोथरूडकरांनी अलोट गर्दी केली होती. आमदार म्हणून मी कोथरूडकरांची पाच वर्षं सेवा करू शकलो. माझ्यावरील प्रेमाची जणू ही पावतीच होती. ही गर्दी, हे प्रेम पाहून मीसुद्धा भारावून गेलो होतो. रॅलीला गर्दी करणाऱ्या माझ्या कोथरूडकरांचे मनापासून आभार मानतो. हे प्रेम असेच कायम राहील याची खात्री आहेच. ही गर्दी म्हणजे जणू महायुतीच्या कोथरूडमधील विजयाचा शंखनादच होता.’ असेही पाटील यावेळी म्हणाले.
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येत्या 20, नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. महायुतीचे बहुतांश उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. अजित पवार गट, शिंदे गट व भाजपची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आज गुरुपुष्यामृत योग साधून अनेक बडे नेते शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत.