पुणे : शहर व परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून पुणे पोलिसांनी सायकल पेट्रोलिंग (Cycle Patrolling) हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे शहर पोलिसांच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आहे.
चंद्रकांत पाटील हे मुंढवा गाव येथील उमेश गायकवाड यांच्या घरी जात असताना, त्यांना मुंढवा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी परिसरात सायकल पेट्रोलिंग करीत असल्याचे दिसले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी थांबून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्याकडून सायकल पेट्रोलिंगमुळे होणार्या फायद्यांची माहिती घेतली. गल्लीबोळातील रस्ते, रहदारीच्या परिसरात चारचाकी पोलीस वाहनांतून गस्त घालताना मर्यादा येतात. या पार्श्वभूमीवर सायकलवरून गस्त घालणे सोपे होत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून व्हिजिबल पेट्रोलिंग होवून, गुन्हयांना प्रतिबंध व नियंत्रण, कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षितता आदी गोष्टींसाठी मदत होत आहे.
सायकल पेट्रोलिंगमुळे (Cycle Patrolling) पोलीस अधिकारी व कर्मचारी हे शारिरीक तंदुरूस्त देखील राहतात. सायकल पेट्रोलिंगचे फायदे सांगितल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल बिनवडे, सहाय्यक उपनिरीक्षक रमेश उगले, हवालदार वैभव मोरे, पोलीस नाईक गोकुळ सोडणवर, पोलीस अंमलदार दयानंद गायकवाड, महिला पोलीस स्वाती परभणे यांचे कौतुक केले. या वेळी माजी मंत्री दिलीप कांबळे, आमदार सुनिल कांबळे, माजी आमदार जगदीश मुळीक, बापुसाहेब पठारे आणि शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे उपस्थित होते.