पुणे : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील अनेक नेत्याचे गुंडांसोबत फोटो पाहायला मिळाले आहेत. पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनीही गजा मारणेकडून सत्कार स्वीकारला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांवरही विरोधकांकडून टीका केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, गजा मारणे याआधी पार्थ पवार, निलेश लंके यांची भेट घेतली होती त्यावेळी मोठी टीका झाली होती.
मंगळवारी कोथरूड मधील एका दहीहंडी कार्यक्रमात गुंड गजा मारणे याने चंद्रकांत पाटील याची भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ भेट देत स्वागत केलं. त्यांच्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे विरोधक चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्याची शक्यता आहे. तर यावर चंद्रकांत पाटील काय प्रतिक्रिया देणार या कडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोण आहे गजा मारणे?
गजा मारणे पुण्यातील अट्टल गुंड आहे. अमोल बधे व पप्पू गावडे खून प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी त्याला 3 वर्ष कारावासाची शिक्षा झाली होती. सध्या तो मारणे टोळीचा प्रमुख आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून 24 गंभीर गुन्हे दाखल आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यांसह बेकायदा शस्त्र बाळगणे अशा कितीतरी गुन्ह्यांत त्याचा सहभाग आहे. त्याच्यावर मोकांतर्गत कारवाई झालेली आहे.