Chandrakant Patil | पुणे : वैकुंठ स्मशानभूमी नवी पेठ येथील वायू प्रदुषणाच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेऊन पुणे महानगरपालिकेला आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीस महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, विकास ढाकणे, पुणे महानगर पालिकेचे विद्युत विद्युत विभागाचे श्रीनिवास कंदुल आदी उपस्थित होते.
लाकडावरील दहन ऐवजी विद्युत व गॅस दहिनीची उभारणी…
वैकुंठ स्मशानभूमीच्या धुरामुळे स्मशानभूमीच्या बाजूच्या सोसायट्यांना धुराचा त्रास होत असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने पालकमंत्री यांनी सूचना दिल्या, वैकुंठ स्मशानभूमीतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी तेथे वापर होत असलेले लाकडावरील शवदहन कमी करावे आणि लाकडावरील दहन ऐवजी विद्युत व गॅस दहिनीची उभारणी करावी.
वैकुंठ स्मशानभूमी परिसरातील लोकांची समस्या दूर करण्यासाठी स्थानिक नागरिकांबरोबर एक समिती गठीत करून तेथील व्यवस्थापनाबाबत अहवाल तयार करण्याबाबत सूचना पाटील यांनी दिल्या. चिमणीची उंची वाढवणे, हवेत जाणाऱ्या धुराचे प्रमाण कमी करण्यासाठी एक ड्राय स्क्रबरची उभारणी करणे आदी उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही त्यांनी दिल्या.