पुणे : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आज रविवारी (दि. १५) महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर आणखी तीन आमदारांना मंत्रिपद देण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक म्हणजेच चार मंत्रीपदे पुण्याला दिली आहेत. मात्र, पिंपर-चिंचवड शहराला एकही मंत्रिपद देण्यात आले नाहीत.
दरम्यान, ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांना अडीच वर्षांसाठी ही संधी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुण्यातील इच्छुक असलेल्या आमदारांना अडीच वर्षानंतर मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शहरातून कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ आणि जिल्ह्यातून आमदार दत्तात्रय भरणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर इच्छुकांमध्ये असणारे भोसरीचे आमदार महेश लांडगे, दौंडचे आमदार राहुल कुल, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे आणि पुणे कॅन्टोनमेंटचे आमदार सुनील कांबळे यांना अडीच वर्षानंतर मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यात महायुतीचे २१ पैकी १८ आमदार
पुणे जिल्ह्यातील २१ आमदारांपैकी फक्त वडगाव शेरीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बापू पठारे व खेड-आळंदीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बाबाजी काळे वगळता सर्व आमदार सत्ताधारी महायुतीचे आहेत. जुन्नर विधानसभेतून शरद सोनवणे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. पण त्यांनी लगेचच शिवसेना पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुतीचे २१ पैकी १८ आमदार जिल्ह्यात आहेत.
या आमदारांचा झाला हिरमोड
या आमदारांपैकी किमान पाच जणांना मंत्रीपदे मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत ३ आमदारांना मंत्रीपदे देण्यात आली आहेत. शहरात पर्वती विधानसभेच्या आमदार माधुरी मिसाळ, कोथरूडचे आमदार चंद्रकात पाटील, इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. मात्र, दौंडमधील भाजपचे राहूल कूल, भोसरीचे आमदार महेश लांडगे, कॅन्टोन्मेटचे आमदार सुनिल कांबळे, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे इच्छुक असतानाही मंत्रिपद न मिळाल्याने त्यांचा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे.