Weather Update Today : उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे, तर दक्षिण भारतात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
सध्या मध्य भारतावर दोन विविध दिशेने येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव होत आहे. या प्रभावातून मध्य भारतावर पावसाळी वातावरण निर्माण झालं आहे. अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राजस्थान, केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्राच्या काही भागांत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे.
सांगली परिसरात तसेच विदर्भातील बुलढाणा भागात पाऊस पडला आहे. यंदा राज्यात अपेक्षित थंडीला सुरुवात झाली नाही. ढगाळ हवामानामुळे थंडीचा पारा कमी जास्त होत आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील तीन, चार दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण कोकण भागात हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.