मंचर : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चाळकवाडी येथील टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांच्या वागणूकीला कंटाळून नागरिकांनी टोल बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. टोल नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून आंबेगाव तालुक्यातील वाहनचालकांना अरेरावी व गुंडगिरीची भाषा वापरून अपमानित केले जात आहे.
या प्रकाराची चौकशी करावी, तसेच संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी वाहनचालक आणि जवळपासच्या ग्रामपंचायतीकडून होत आहे. अन्यथा आंबेगाव तालुक्यातील नागरिकांना टोल बंद आंदोलन करावे लागेल, असा इशारा पिंपळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक पोखरकर व भाजप कायदा आघाडीचे जिल्ह्याअध्यक्ष ॲड. श्रीराम बांगर यांनी दिला आहे.
आंबेगाव, खेड व जुन्नर तालुक्यातील शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी व अन्य कामांसाठी चाळकवाडीच्या टोलनाक्याहून सतत ये-जा करत असतात. शेतकरी व स्थानिक नागरिकांकडून टोल वसुली करू नये, अशा सूचना टोल प्रशासनाला देऊनही टोल वसुलीसाठी त्यांच्याकडून दादागिरी, शिवीगाळ केली जात आहे.
या दादागिरीच्या विरोधात आंबेगाव तालुक्यातील सरपंच परिषदेचे शिष्टमंडळ सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांना निवेदन देऊन दाद मागण्यासाठी भेटणार आहे.