पिंपरी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या चार महिन्यांपासून महाराष्ट्रात विविध प्रकारची आंदोलने सुरू आहेत. मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज पिंपरी-चिंचवडच्या वतीने गेल्या २५ दिवसांपासून पिंपरी येथे सुरू असलेले साखळी उपोषण स्थगित करण्यात आले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे उपोषण सुरू होते.
सरकारने २४ डिसेंबर २०२३ पर्यंत आरक्षणाची मागणी पूर्ण करतो, असे आश्वासन दिले होते. परंतु, हे आश्वासन महाराष्ट्र शासन पूर्ण करू शकले नाही. आश्वासन पूर्ण करावे यासाठी महाराष्ट्रभर मराठा समाज विविध ठिकाणी साखळी उपोषण करत होता. याचाच एक भाग म्हणून पिंपरीत मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाचे गेल्या २५ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू होते. आता हे उपोषण स्थगित करण्यात आले.
उपोषणास बसलेले आंदोलक वैभव जाधव, मीरा कदम, संतोष शिंदे, रावसाहेब गंगाधरे, लहू लांडगे, दिलीप गावडे, वसंतराव पाटील यांनी उपोषण मागे घेतले. या वेळी प्रकाश जाधव, मारुती भापकर उपस्थित होते. दरम्यान, २० जानेवारीपर्यंत मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र न मिळाल्यास मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये आंदोलन होणार आहे. या आंदोलनास पिंपरी-चिंचवड शहरातून लाखो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. आंदोलनाच्या तयारीसाठी शहरात विविध ठिकाणी बैठकांचे नियोजन केले आहे. आंदोलनाच्या नियोजनासाठीच साखळी उपोषण स्थगित केल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.