पुणे: मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांना चांगलाच दणका दिला आहे. विना तिकीट प्रवासी आणि सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वेने एप्रिल २०२४ या एका महिन्यात तब्बल ४ कोटी ६ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इन्दू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने आणि तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.
रेल्वे प्रशासनाला तिकीट तपासणीदरम्यान ३५ हजार १२९ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून एकूण ३ कोटी १२ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. तर, १४ हजार ४६३ प्रवाशांना अनियमित प्रवासासाठी ९३ लाख ९० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या २४३ प्रवाशांकडून ३३ हजार ६९० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.