पुणे : भारतीय प्राणी कल्याण मंडळाने देशवासियांना १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे बरोबरच ‘काऊ हग डे’ साजरा करण्याचे आवाहन केले आहे. केंद्र, सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने १४ फेब्रुवारी हा दिवस ‘काऊ हग डे’ अर्थात गाईला मिठी मारून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे. तसे पत्रदेखील या विभागाच्या वतीने काढण्यात आले आहे.
आपल्या सर्वांना माहित आहे की गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, आपले जीवन आणि पशुधन टिकवून ठेवते. मानवतेला सर्वस्व देणार्या मातेप्रमाणे पोषण देणार्या स्वभावामुळे ती कामधेनू आणि गौमाता म्हणून ओळखली जाते.
या आवाहनात पुढे म्हटले आहे की, “आमच्या काळात पाश्चात्य संस्कृतीच्या प्रगतीमुळे वैदिक परंपरा जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पाश्चिमात्य संस्कृतीच्या झगमगाटाने आपली भौतिक संस्कृती आणि वारसा विसरला आहे.
दरम्यान, गाईचे अपार फायदे लक्षात घेता, गाईला मिठी मारल्याने भावनिक समृद्धी येईल, वैयक्तिक आणि सामूहिक आनंद वाढेल. त्यामुळे गौमातेचे महत्त्व लक्षात घेऊन सर्व गोप्रेमींनी १४ फेब्रुवारी हा दिवस गाई आलिंगन दिन म्हणून साजरा करून जीवन आनंदी आणि सकारात्मक उर्जेने परिपूर्ण बनवता येईल, असे आवाहन पत्राच्या शेवटी स्पष्ट करण्यात आले आहे.