पुणे : अल्पवयीन मुलींवर होणा-या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. त्यानुसार, आता सरकारनेही यावर कडक पावले उचलताना दिसत आहे. अशातच आता पुणे शहरातील महापालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करुन देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
महापालिका शाळांच्या परिसरात कचरा टाकणे, शाळेतील साहित्य चोरणे, मैदानात रात्रीच्या वेळी मद्यपी तसेच नशा करणा-यांच्या वावर असणे, तसेच गुन्हेगारी कृत्य करणे असे अनेक गैरप्रकार रोखण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून महापालिका आयुक्तांकडे मागणी करण्यात आली होती. या मागणीला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून तीन कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
आयुक्तांनी विद्युत विभागाने सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, विद्युत विभागाकडे निधी उपलब्ध नसल्याचे कळविण्यात आले होते. त्यानंतर आता शाळांच्या सुरक्षेचे प्राधान्य लक्षात घेता पुणे महापालिकेने शहरात हायड्रो ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी अंदाजपत्रकात 12 कोटींची तरतूद केली होती. हा प्रकल्प होणार नसल्याने या निधीतून तीन कोटींचा निधी शाळांना सीसीटीव्ही बसविण्यासाठी वर्गीकरणाद्वारे देण्यात आला आहे.